मुंबई : दहशतवादाचा बिमोड करणे हे आज जगापुढील आव्हान आहे, मात्र दहशतवाद कधीही जिंकू शकत नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्त्रायल भारतासोबत खांद्याला खांदा लावून प्रयत्न करेल, असे प्रतिपादन इस्त्रायलचे राष्ट्राध्यक्ष रूवेन रिवलिन यांनी येथे केले.

श्री.रिवलिन यांचे आठवडाभराच्या भारत दौऱ्‍याच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत आगमन झाले. त्यानिमित्त हॉटेल ताज येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री.रिवलिन यांच्या पत्नी श्रीमती नेचामा रिवलिन, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत डेव्हिड अकोव्ह आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी 26/11 च्या हल्ल्यात हॉटेल ताज येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृतीस्थळावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री.रिवलिन म्हणाले, दहशतवाद कधीही जिंकू शकत नाही. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत व इस्त्रायल एकदिलाने काम करतील. इस्त्रायल ‘मेक इन इंडिया’सारख्या योजनांत सक्रिय सहभागी होत भारताला औद्योगिक विकासाच्या वाटचालीत मदत करणार आहे.

यावेळी राज्यपाल श्री.राव म्हणाले, देशाच्या विकासात ज्यू समाजाचे मोठे योगदान आहे. 26/11 च्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यास शब्दही कमी पडतात. मुंबईतील सर्व जातीधर्मांच्या नागरिकांनी तीन दिवस या हल्ल्याला निर्भयपणे तोंड दिले. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. इस्त्रायलच्या सहकार्याने ही कामगिरी निश्चित यशस्वी होईल.
                     
नरिमन हाऊस येथे प्रार्थना

यावेळी श्री.रिवलिन यांनी नरिमन हाऊस येथे भेट दिली. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊस येथे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली व उपस्थितांनी प्रार्थना म्हटली.


इस्त्रायलच्या राष्ट्राध्यक्षांना लेझिमची भुरळ

इस्त्रायलच्या राष्ट्राध्यक्षांच्या यांच्या आगमनप्रसंगी विमानतळावर राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांचे दर्शन घडविणारा छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी इस्त्रायलच्या राष्ट्राध्यक्ष श्री. रिवलिन यांनाही लेझिम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी कलाकारांसमवेत लेझिम हातात घेऊन ताल धरला. श्री.रिवलिन यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांची पाठ थोपटत दाद दिली.
Axact

Post A Comment:

0 comments: